कॉंग्रेसच्या लोकसभा नेतेपदी अधिररंजन चौधरी

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या लोकसभा गटनेतेपदी अधिररंजन चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र पक्षातर्फे लोकसभेच्या सभापतींकडे पाठवले जाणार आहे. लोकसभेतील सिंगल लार्जेस्ट पार्टी या नात्याने सरकारच्या सर्व निवड समित्यांवरही त्यांच्या नियुक्तीची शिफारस पक्षाने केली आहे.

या पदावर राहुल गांधी यांनी काम करावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्याला राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर आज झालेल्या बैठकीत चौधरी यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

काल पासून लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले तरी कॉंग्रेसने आपल्या पक्ष नेत्याबद्दल निर्णय घेतला नव्हता. त्या विषयी बातम्या आल्यानंतर आज झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. पक्षाचे आधीचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्या जागी ही नवीन निवड करण्यात आली आहे. या जागेसाठी शशी थरूर, मनिष तिवारी, केरळातील खासदार के सुरेश यांच्या नावांचीही चर्चा होती. पण पक्षाने चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आजच्या बैठकीत लोकसभा सभापतीपदाच्या निवडणुकीत ओमप्रकाश बाली यांना विरोध न करण्याची भूमिका निश्‍चीत केली आहे. त्यामुळे बाली यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्‍यता वाढली आहे. दरम्यान कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा इरादा राहुल गांधी यांनी व्यक्त केला असून त्याविषयी ते अद्याप ठाम आहेत त्यामुळे निर्माण झालेला पेचप्रंग अद्याप कायम आहे. राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्षपद सोडले तरी त्यांनी लोकसभेतील पक्षाचे नेतेपद स्वत:कडे घ्यावे असेही त्यांना सांगण्यात आले होते. पण त्यांनी त्यालाही नकार दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.