आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आज पासून लागू झाली आहे. जिल्ह्यातील दहाही मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित होते.

माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये 15 लाख 84 हजार 271 पुरुष, 15 लाख 06 हजार 308 स्त्री तर 81 इतर अशी एकूण 30 लाख 90 हजार 660 मतदार संख्या आहे. विधानसभा मतदार संघासाठी 10 निवडणूक निर्णय अधिकारी तसेच 31 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 3342 इतकी मतदान केंद्राची संख्या असून कायम स्वरुपी 3340 तर चिक्केवाडी आणि कडलगे येथे प्रत्येकी एक तात्पुरती केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 70 क्रिटीकल मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर 20058 आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या असून 26982 उपलब्ध कर्मचारी आहेत. 20755 दिव्यांग मतदारांची नोंदणी असून या मतदारांसाठी व्हिल चेअर, वाहतूक सुविधा, मदतनीस अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

विविध पक्षांचे फलक, होर्डिंगवरील मजकूर उतरविण्यात यावा, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे उतरविणे, झाकून ठेवणे अशी कार्यवाही सुरु आहे. परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई करण्यात येईल. समाज माध्यमांवरील प्रचारासाठीही परवानगीची आवश्यकता आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल करु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कर्नाटक सिमा भागात 14 ठिकाणी नाका बंदी करुन तपासणी नाके

10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग करण्यात येईल. सिमा भागातील जिल्ह्यांची सोमवारी बैठक होणार आहे. विशेषत: कर्नाटक सिमा भागात 14 ठिकाणी नाका बंदी करुन तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)