टपाल खात्यातर्फे सुविधा : आधार नोंदणी, अद्ययावतीकरणास नागरिकांचा प्रतिसाद
पुणे – नागरिकांच्या सुविधेसाठी टपाल खात्यातर्फे आधार कार्ड नोंदणी, तसेच आधार कार्डचे अद्ययावतीकरण केले जाते. खात्यातर्फे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 2 लाख 18 हजार 430 नागरिकांना आधारकार्ड वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे जीपीओचे वरिष्ठ पोस्टमास्तर एन. आर. शेडगे यांनी दिली.
जिल्हातील 248 टपाल कार्यालयांत आधार कार्डसंबंधीची सुविधा उपलब्ध आहे. एप्रिल 2019 पासून आतापर्यंत या सर्व केंद्रामध्ये मिळून एकूण 2 लाख 18 हजार 430 आधारकार्ड वितरीत करण्यात आली आहेत. यामध्ये नवीन आधारकार्ड काढणे, जन्मतारीख-पत्ता बदलणे, मोबाइल नंबर बदलणे, छायाचित्र बदलणे आदी दुरुस्त्या अशी विविध कामांचा समावेश होतो. टपाल कार्यालयातील आधार काउंटरला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शेडगे यांनी सांगितले.
केवळ टपाल कार्यालयातच नव्हे, तर शाळा, महाविद्यालयांतूनही टपाल खात्यातर्फे आधारसंबंधी मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 170 शिबिरांमधून अनेक नागरिकांनी त्यांची आधारकार्ड काढून घेतली आहेत. तर अनेकांनी आधारमधील दुरुस्त्या करवून घेतल्या आहेत, असे शेडगे यांनी सांगितले.