वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवून व देयके भरून महावितरण’ला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केले आहे. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले.
ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल ऍपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीपण जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
करोना काळात रिडींग न घेता बिले पाठविल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रिडींग घेऊन वीज बिले पाठविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडींग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल ऍपद्वारे रिडींग पाठविले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्सचेंजमधून दररोज साधारणतः 1100 ते 1800 मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्सचेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा