नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी 2,826.92 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2019-20 साठी करण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा या आर्थिक वर्षासाठी क्रीडा क्षेत्रात 50 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या “खेलो इंडिया’साठी 291.42 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे अन्य क्रीडा संघटनांसाठीच्या तरतूदीमध्ये कपात झाली आहे. “नॅशनल स्पोर्टस फेडरेशन’साठीची तरतूद गेल्या वर्षीपेक्षा 55 कोटी रुपयांनी घटून 245 कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात या संघटनेसाठी 300.85 कोटींची तरतूद होती.
खेळाडूंसाठीच्या प्रोत्साहनासाठीचा निधीही 111 कोटी रुपयांवरून 70 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीड विकास निधीही पूर्वीच्या 77.15 कोटींवरून 50 कोटींपर्यंत कमी करण्यात आला आहे. “स्पोर्टस ऍथोरिटी ऑफ इंडिया’साठीच्या 615 कोटी रुपयांची सुधारित तरतूद 500 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
खेळाडूंसाठीच्या राष्ट्रीय कल्याण निधी मात्र गेल्या वर्षाप्रमाणे 2 कोटी रुपये इतका कायम राहणार आहे. तर जम्मू आणि काश्मीरमधील क्रीडा सुविधांसाठी असलेल्या 50 कोटी रुपयांच्या तरतूदीमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फिजीकल एज्युकेशनसाठीचा निधी गेल्या वर्षीपेक्षा 5 कोटी रुपयांनी वाढवून 55 कोटी रुपये इतका करण्यात आला आहे.