पुणे : क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येणारी खरेदी आणि कामांची यादी करून अंमलबजावणीबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांनी दिली.
महापालिकेमध्ये “स’ यादीतून कुठल्याही वरिष्ठ स्तरावरील समिती अथवा अधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय होणाऱ्या 10 लाख रुपयांच्या आतील खरेदी आणि अचानक कामांना “ब्रेक’ लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित येणारी कामे, त्यांना कोणत्या वस्तू खरेदी करण्याचे अधिकार आहेत याची यादी तयार केली जात असून, ही कामे कोणी करायची याविषयी धोरण ठरवण्यात येणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले.
याशिवाय क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येणाऱ्या ज्या कामांसाठी छोट्या छोट्या रकमांच्या निविदा काढण्यात येतात. त्याऐवजी ती यंत्रणा महापालिकेच्याच वतीने खरेदी करून किंवा भाडेतत्त्वाने देऊन कामे कशी करत येतील याचा विचारही यानिमित्ताने करणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले. क्षेत्रीय कार्यालयांच्या “स’ यादीतून बाकडे, कचरा बकेट, व्यायामशाळेसाठी साहित्य, फायर प्रिव्हेंशन साहित्य यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. याशिवाय प्रभागातील अन्य छोटी-मोठी कामे केली जातात. नगरसेवकांच्या मागणीनुसार ही कामे केली जातात आणि याच कामांसाठी वर्गीकरणेही केली जातात.
यातून काढलेल्या निविदा या 9 लाख रुपयांच्या पुढे आणि दहा लाख रुपयांच्या आतील असतात. अशा निविदा शेकड्याने असतात. त्यामुळे निधी खर्ची टाकणे एवढा एकच उद्देश डोळ्यांपुढे ठेवून काम केले जाते. त्यामुळे महापालिकेचा विकास निधी याच कामात संपून जातो आणि मोठ्या प्रकल्पांना पैसेच उरत नाहीत. त्यामुळे या संदर्भात आता धोरणच निश्चित केले जाणार आहे.