सातारकरांच्या चिंतेत भर

रविवार पेठेनंतर गुरुवार पेठेतही करोनाबाधित रुग्ण

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या आठशेच्यावर गेली असून सातारा शहरातील रविवार पेठेपाठोपाठ गुरुवार पेठेत बाधित रुग्ण आढळल्याने सातारकरांच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर सातारा शहरात आता बाधित रुग्ण वाढू लागल्याने धास्ती कायम असल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्याच्या सर्व तालुक्‍यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आठशेच्या वर रुग्ण संख्या गेली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. सातारा शहर आणि परिसरात रुग्णांच्या संख्येत आता वाढ होऊ लागल्याने शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे. शाहूपुरी, वर्ये, सैदापूर, बारावकरनगर, कारंडवाडी, देगावरोड, शाहूनगर आदी भागात रुग्ण आढळून आले होते.

काही दिवसांपूर्वी मुंबई येथून रविवार पेठेत नातेवाईकांकडे आलेली 14 वर्षीय मुलगी बाधित आढळून आली होती. या मुलीच्या सहवासात आलेले नातेवाईक क्वारंटाईन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात बाधित आढळल्याने चिंता वाढलेली असतानाच शनिवारी आलेल्या अहवालानुसार सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 54 वर्षीय महिला बाधित आढळली आहे.

रविवार पेठेपाठोपाठ गुरुवार पेठेत बाधित रुग्ण आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. संबंधित महिलेची ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे सांगण्यात येत असून ती महिला कुणाच्या संपर्कात आली याचा यंत्रणा शोध घेत आहे. प्रशासनाने संबंधित महिला वास्तव्य करत असलेल्या गुरुवार पेठेतील अपार्टमेंटचा परिसर सील केला असून कंटोटमेंट झोन जाहीर केला आहे. या महिलेच्या सहवासातील कुटुंबियांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.