अडचणीत भर! अनिल देशमुखांची आजपासूनच होणार चौकशी; दिल्लीवरून येणार विशेष पथक

परमबीर सिंह यांचा जबाबही नोंदवला जाणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अनिल देशमुख यांची सीबीआय प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी काही तासांमध्ये राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सीबीआयचा हा तपास आजपासूनच सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सायंकाळी सीबीआयचे विशेष तुकडी दिल्लीहून मुंबईमध्ये दाखल होणार असून परमबीर सिंह यांचा जबाबही या प्रकरणामध्ये नोंदवला जाणार आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयमधील भ्रष्टाचारविरोधी विभागातील तपास अधिकाऱ्यांची विशेष तुकडी परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करणार आहे. सीबीआयच्या या तुकडीला देशामध्ये कुठेही तपास करण्याचा अधिकार असल्याने त्यांचे कार्यक्षेत्र देशभरात आहे. सीबीआयने १५ दिवसांत गृहमंत्र्यांवरील आरोपांची प्राथमिक चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आज सायंकाळपर्यंत न्यायालयाच्या या आदेशाची छापील प्रत सीबीआयच्या हाती आल्यानंतर तपासाला सुरुवात होणार आहे. आदेश हाती आल्यानंतर सीबीआयकडून आजच परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला जाईल आणि त्यानंतर पुढील तपास केला जाणार सांगण्यात येत आहे.

एखादा मंत्री भ्रष्टाचार, गुन्हा करत आहे, असा आरोप सेवेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने करणे हे आजपर्यंत कधीही ऐकलेले नाही. त्यामुळेच या घटनेकडे न्यायालय केवळ बघ्याच्या भूमिकेतून पाहू शकत नाही. या प्रकरणाची पारदर्शी, निष्पक्षपाती, विश्वासार्ह, स्वतंत्र चौकशी ही नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. म्हणूनच कायद्याच्या राज्यात स्वतंत्र तपास यंत्रणेकडून अशी चौकशी गरजेची आहे.

देशमुख हे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाचा तपास राज्यातील पोलिसांकडे सोपवण्यात आल्यास तो स्वतंत्रपणे होणार नाही. त्यामुळेच न्याय मिळण्याच्या दृष्टीने सीबीआयच्या संचालकांना या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यास सांगणे अनुचित ठरेल. ही प्राथमिक चौकशी कायद्यानुसार केली जावी आणि १५ दिवसांत ती पूर्ण केली जावी, असे न्यायालयाने म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.