महाराष्ट्राच्या चिंतेत भर! दुसऱ्यांदा होणाऱ्या करोनाची लक्षणे गंभीर

मुंबई – देशासह राज्यातही करोना व्हायरसचे थैमान सुरूच आहे. करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. परंतु, महाराष्ट्रच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. करोनामुक्त झालेल्या आरोग्य सेवेतील चार कर्मचाऱ्यांना पुन्हा लागण झाली आहे. पण त्यांची प्रकृती यावेळी अधिक गंभीर आहे.

दुसऱ्यांदा करोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी तीन जण डॉक्टर आहेत. हे तीनही डॉक्टर बृह्नमुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर एक आरोग्य कर्मचारी हिंदुजा रुग्णालयातील आहे. प्रसिद्ध लॅन्सेट जर्नलमध्ये याविषयीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार चारही जणांमध्ये करोना संक्रमणाची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक आहे. हा अभ्यास इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंट्रिग्रेटिव बायलॉजी (IGIB) आणि दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अॅण्ड बॉयोटेक्नॉलॉजी (ICGEB) दोन्ही संस्थांनी केली आहे.

पूर्वीच्या करोना संसर्गाच्या तुलनेत दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर चौघांनाही अधिक गंभीर लक्षणे दिसून आली आणि त्यांची प्रकृतीही नाजूक बनली होती. डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी सातत्याने करोना रुग्णांच्या संपर्कात राहत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा करोना होण्याचा धोका अधिक आहे.

डॉक्टरांच्या मते, आरटी-पीसीआर तपासणीतून दुसऱ्यांदा झालेले करोना व्हायरसचे निश्चितपणे निदान होऊ शकत नाही. जिनोम सिक्वेसिंगच्या माध्यमातूनच दुसऱ्यांदा करोना झाला आहे, की नाही याचे निदान होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्यांदा करोना झाल्यानंतर रुग्णांची परिस्थिती गंभीर बनते. या संशोधनाच्या निष्कर्षांतून लोक धडा घेतील आणि अधिक सुरक्षितता बाळगतील अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.