ऍड. प्रताप ढाकणे राष्ट्रवादी सोडण्याच्या वाटेवर

28 जुलै रोजी ढाकणे समर्थकांचा निर्धार मेळावा
बाबासाहेब गर्जे

पाथर्डी – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते ऍड. प्रताप ढाकणे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी त्यांच्या समर्थकाकडून दबाव वाढत आहे. 28 जुलै रोजी ढाकणे समर्थकांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले असून, या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निर्धार मेळाव्याची कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू असून, आता थांबाचं नाही काका, आता ठरावचंय, असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.

नुकताच ऍड. ढाकणे यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा केला. संपूर्ण मतदारसंघात ढाकणे यांना शुभेच्छा देणारे फलक झळकत आहेत. या शुभेच्छा फलकावरून राष्ट्रवादी हद्दपार झालेली दिसली. गेल्या काही महिन्यांपासून ऍड. ढाकणे यांनी पक्ष बाजूला ठेवून विविध कार्यक्रम घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमची घुसमट होत असल्याचे त्यांचे समर्थक जाहीरपणे बोलतात. ऍड. ढाकणे यांनी राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांकडून विधानसभा निवडणूक लढवावी, असा समर्थकांचा आग्रह दिसतो. एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता व कार्यकर्त्यांचा दबाव लक्षात घेता ऍड. ढाकणे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवरून आगामी विधानसभा निवडणूक भाजप-सेना स्वतंत्र लढवण्याची शक्‍यता आहे. राज्यातील घडामोडी व ढाकणे यांच्या गोटातील हालचाली पाहता ऍड. प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादी सोडल्यास शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ढाकणे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात. 28 जुलै रोजी होणाऱ्या निर्धार मेळाव्यातून ढाकणे यांच्या पुढील वाटचालीचे चित्र स्पष्ट होणार आहे. समर्थकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबाबत ऍड. ढाकणे यांना छेडले असता, निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांचे मते जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)