Adani Group Share: अदानी समूहातील शेअर वधारले; जगातील अनेक गुंतवणूकदारांनी पाठिंबा दिल्याचा परिणाम

मुंबई – अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात शुक्रवारी बरीच वाढ झाली. जपान, संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका, टांझानिया इत्यादी देशातील गुंतवणूकदारांनी अदानी समूहावर आपला विश्वास असल्याचे जाहीर केले आहे. या कारणामुळे गेल्या तीन दिवसापासून या समूहातील शेअरच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येते.
अमेरिकेत या समूहातील महत्त्वाच्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर शेअरच्या किमती घसरल्या होत्या. मात्र हे आरोप गंभीर नाहीत. आर्थिक दंडानंतर सर्व परिस्थिती सुरळीत होईल असे अदानी समूहाने सांगितल्यानंतर शेअरची घसरण थांबली होती.
नंतर फ्रान्समधील टोटल एनर्जी कंपनीने गुंतवणूक थांबल्यानंतर पुन्हा शेअर घसरले होते. मात्र अदानी समूहात गुंतवणूक असणार्या इतर महत्त्वाच्या देशातील गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील गुंतवणुकीवर किंवा प्रकल्पावर कसलाही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर परवापासून या समूहातील शेअरच्या भावात वाढ होत आहे.
शुक्रवारी या समुहातील सर्व 11 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. गुरुवारी पाच कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. शुक्रवारी अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरचा भाव 22 टक्क्यांनी, अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअरचा भाव 15 टक्क्यांनी, अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरचा भाव चार टक्क्यांनी, अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी, एसीसी कंपनीच्या शेअरचा भाव दीड टक्क्यांनी, अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्यांने.
अदानी एंटरप्राइजेस या कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्याने, एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरचा भाव अर्धा टक्क्यांने वाढला. अदानी विल्मर कंपनीच्या शेअरच्या दरात माफक वाढ झाली.





