नवी दिल्ली – देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये गौतम अडानी यांनी चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. तर मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. आकडेवारीनुसार अडानी यांनी गेल्या वर्षभरात दिवसाला 1002 कोटी रूपये कमावले आहेत. यानुसार त्यांची सपत्ती 3 लाख 65 हजार 700 कोटी रुपये वाढली आहे.
करोना संकटकाळात देशातील श्रीमंत व्यक्तींची संख्या 1000 हून अधिक झाली आहे. ‘हुरन इंडिया रिच लिस्ट 2021’ च्या एका रिपोर्टमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. श्रीमंतांच्या या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी 7लाख 18 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह सलग दहाव्या वर्षी श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या स्थानावर राहिले आहेत.
मुकेश अंबानींच्या कमाईचा स्पीड घटला –
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबाच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 9 टक्ट्यांचा बदल झाला आहे. मुकेश अंबानी यांनी करोना संकटकाळात गेल्या वर्षात दररोज 163 कोटी रुपयांची कमाई केली. तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी गेल्या वर्षी दररोज 1002 कोटी रुपयांची कमाई केली. एका वर्षात अडानी यांची संपत्ती 261 टक्क्यांनी वाढून 5 लाख 5 हजार 900 कोटी रुपये झाली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे पूनावालाची संपत्ती 74 टक्क्यांनी वाढली –
करोना काळात चर्चेत असलेले सायरस पूनावाला यांनी गेल्या वर्षी दररोज 190 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे पूनावालांची संपत्ती 74 टक्क्यांनी वाढून 1 लाख 63 हजार 700 कोटी रुपये झाली आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा सहावा क्रमांक लागतो.