नवी दिल्ली – अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जीने श्रीलंकेतील दोन सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रकल्पातून माघार घेतली आहे. श्रीलंका सरकारने विजेच्या दराबाबत पुन्हा वाटाघाटी करण्याची गरज असल्याचे सांगितल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने या प्रकल्पातून पूर्णपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या कंपनीने म्हटले आहे की, सर्व बाबींचा विचार करून आता कंपनीने श्रीलंकेमध्ये दोन ऊर्जा प्रकल्प आणि दोन ट्रान्समिशन प्रकल्पावर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये एक ऑब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार होती. ऊर्जा निर्मितीबरोबरच ऊर्जा वहन प्रकल्पाचाही यामध्ये समावेश होता. श्रीलंकेतील जुन्या सरकारने या संदर्भात निर्णय घेतला होता.
मात्र नव्या सरकारने सर्व प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर वीजदर जास्त आहे, तो कमी करण्याची गरज व्यक्त केली होती व तशी सूचना अदानी समूहाकडे पाठविली होती. श्रीलंकेतील पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यामुळेही या प्रकल्पाच्या कामकाजात अडथळे येत होते.
या अगोदरच्या करारानुसार अदानी समूह या प्रकल्पातील वीज 0.082 डॉलर प्रति किलो वॅट अवर दराने विकणार होता. मात्र नव्या सरकारने हा दर कमी करून 0.060 डॉलर प्रति किलो वॅट अवर करण्याची मागणी केली होती. अदानीे समूहाला ही मागणी मान्य नव्हती.
अदानी समूहाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, जरी आम्ही या दोन प्रकल्पातून माघार घेतली असली तरी श्रीलंका सरकारबरोबर आमचे काम चालूच राहणार आहे. भविष्यामध्ये नव्या प्रकल्पाबाबत सध्याच्या सरकार बरोबर चर्चा चालू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोलंबो येथील बंदर विकसित करण्यासाठी अदानी समूह 700 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पात कसल्याही अडचणी आतापर्यंत आलेल्या नाहीत.