मुंबई – अभिनेत्री विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. बहुतांश चित्रपट हिट झालेले आहेत. काही चित्रपटातील पात्र तर सदाबहार आहेत. 2007 साली प्रदर्शित झालेल्या भुलभुलैया या चित्रपटात विद्या बालनने मंजुलीकाचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. दरम्यान, लवकरच भुलभुलैया 2 येणार असून यात देखील मंजुलिकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा विद्या बालनच दिसणार असल्याची माहिती दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी दिली आहे.
अनीस बज्मी यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, भुलभुलैया चित्रपटातील मंजुलिका हे माझे आवडते पात्र आहे. जिथे भुलभुलैया आहे तिथे निश्चितच विद्या बालन असेल. विद्या बालन भुलभुलैया 2 या चित्रपटातदेखील दिसेल, असं अनीस बज्मी यांनी म्हटलं आहे. आता भुलभुलैया 2 मध्ये विद्या आणखी एकदा आपला अभिनय सादर करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.
विद्या बालनने परिणीता या रोमँटिक चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तीने संजय दत्त आणि सैफ अली खानसारख्या बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर विद्या बालनच्या करिअरचा ग्राफ चढाच राहिला. डर्टी पिक्चरमध्ये विद्याने साकारलेले सिल्क स्मिता हे पात्र तर चित्रपट रसिकांना चांगलेच आवडले होते. या चित्रपटातील भूमिकेमुळे विद्या बालनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच विद्या बालन शेरनी या चित्रपटात झळकली होती.
भुलभुलैया 2 या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या चित्रपटात अक्षय कुमारच्या ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर कार्तिकसोबत कियारा आडवाणी आणि तब्बू यांच्याही अभिनयाची कमाल पाहायला मिळणार आहे. भुलभुलैया 1 या चित्रपटात परेश रावल तसेच अमीषा पटेल, राजपाल यादव या दिग्गजांनी अभिनय केला होता.