मुंबई,- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे मुंबईत निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ त्यांनी गाजविला. मालिकांमध्येही त्यांनी काम केले. प्रपंच ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली आक्का ही भूमिका त्याकाळी गाजली होती. सांजसावल्या मालिकेतही त्यांनी काम केले. एका लग्नाची दुसरी गोष्टमधील माई आजी तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी आजीची भूमिका साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले.
कुबेराचे धन, गृहदेवता, गंगेत घोडे न्हाले, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन, अगंबाई अरेच्चा हे त्यांचे गाजलेले चित्रपट. नेताजी पालकर चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर जगाच्या पाठीवर चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
सौभद्र, एकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळ आदी संगीत नाटकांतून तसेच दिल्या घरी तू सुखी राहा, तुझं आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, गोष्ट जन्मांतरीची, दिवा जळू दे सारी रात, कालचक्र आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या आहेत.