मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियातील पोस्टमुळे सतत वाद आणि चर्चेत येत असते. यापूर्वी देखील तिच्या पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे वादात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे. केतकी चितळेने केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडिया युजर्सने केतकीला सुनावलं आहे. तसेच या पोस्टमुळे अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.
कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मी स्वत: व माझे सारखे इतर कार्यकर्ते उद्वीग्न झालेलो आहोत. तसेच केतकी चितळे हिने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे. सदर महिलेने आणखी देखील पोस्ट केल्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक आणि द्वेषकारक पोस्ट करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.