नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. शुक्रवारी कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.
कंगना राणावतने तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनाने थेट लखनौ गाठले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले.
Famous Actress Kangana Ranawat met @myogiadityanath Hon’ble Chief Minister UP, who presented her with an @UP_ODOP product. Kangna ji will be our Brand Ambassador for ODOP @CMOfficeUP pic.twitter.com/XUJTiStRqv
— Navneet Sehgal (@navneetsehgal3) October 1, 2021
ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं त्यांनी कंगनाला दिलं आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचे देखील कंगना म्हणाली आहे.