अभिनेत्री जुई गडकरीवर पार पडली शस्त्रक्रिया; फोटो शेअर करत म्हणाली…

Jui Gadkari | अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. यातील तिच्या सायली या व्यक्तिरेखाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर देखील जुई सक्रिय असल्याचे दिसते. अनेक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे.
हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘आयव्ही ऑफ, आज डिचार्ज मिळेल. मला काय झालं होतं, ते लवकरच सांगेन.’ तर जुईने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये तिने सुंदर मेकअप केलेला फोटोही शेअर केला आहे. जुईने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शस्त्रक्रिया झाल्यानंतर मेकअप केल्यावर मी कशी दिसते, केवळ हे तपासण्यासाठी काही सेल्फी काढले आहेत. कदाचित डिलीट करेन किंवा नक्कीच डिलीट करेन! तोपर्यंत फॉलो करत राहा आणि बघत राहा ठरलं तर मग.’
पुढे तिने म्हटले की, ‘जे काही घडलं आहे त्याविषयी सविस्तर व्हिडिओ पोस्ट लवकरच करेन. लवकरच शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होते आहे.’ मात्र तिने नेमके काय झाले आहे याची माहिती चाहत्यांना दिलेली नाही. यावरून सध्या तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये जुई दिसत असली तरी आजारपणासाठी घेतलेल्या ब्रेकमुळे ती आगामी एपिसोडमधून गायब होऊ शकते. मालिकेच्या कथानकामध्ये प्रियाने जिन्यावरुन धक्का दिल्याने जुईचा अपघात होता, असा ट्वीस्ट दाखवण्यात आला आहे.
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई गडकरी मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र काही वर्षांपूर्वी जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आता तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. परंतु जुई अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.





