मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पाय आणखी खोलात गेला आहे. 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर खंडणी वसुल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचे म्हटले आहे.
ईडीने समन्स बजावल्यानंतर जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. सुकेशकडून महागडी जनावरे गिफ्ट घेणे महागात पडले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.
जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.