मुंबई : दूरचित्रवाणी अभिनेत्री गेहना वसिष्ठ हिला गुरूवारी हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल केले. एका वेब सिरीजचे छायाचित्रण करत असताना ही घटना घडली.
मुंबईतील रक्षा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांनी सलग दीर्घकाळ काम केले आणि पुरेसा आहार घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी छातीचे ठोके जवळपास बंद झाले होते. त्याचा रक्तदाब अत्यंत खालावला होता. डॉक्टरांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्यांचे हृदयाचे ठेके जाणवायला लागले. त्यांनी त्या दिवश घेतलेली औषधे आणि एनर्जी ड्रींक यांच्या सेवनाचा परिणाम होऊन त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.
त्या अद्याप उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्या मेंदुला पुरेसा ऑक्सीजनचा पुरवठा होण्यासाठी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. सध्या तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार पुरेसा आहार न घेता सलग 48 तास गेहना काम करत होत्या. त्यांची रक्तातील साखर वाढलेली आहे. त्यांनी एनर्जी ड्रिंक घेतल्याचे आणि मधुमेहावरील औषधे घेतल्याचे आम्हास सांगण्यात आले. त्यांच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या असून त्याचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल,असे डॉक्टरांनी सांगितले.