अभिनेत्री छाया कदमचे ‘हे’ स्वप्न पूर्ण

अभिनेत्री छाया कदमनं पाहिलेल्या स्वप्न साकार करण्यासाठी गेल्या वर्षी एक पाऊल पडलं होतं. पण तो योग जुळून आला नाही. यंदा मात्र छायानं स्वप्नाला गवसणी घालत अखेर स्वप्नपूर्ती साध्य केली. छायाचं स्वप्न होतं राज्य चित्रपट पुरस्कार पटकावण्याचं… न्यूड या चित्रपटातील भूमिकेसाठी छाया या पुरस्कराची मानकरी ठरली.

भूमिका कोणतीही असली, छाया कदम म्हणजे उत्तम अभिनय हे समीकरणच आहे. गेल्या वर्षी छायाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं. पण पुरस्कार मिळू शकला नाही. त्यामुळे स्वप्न पूर्ण न झाल्याची किचिंत निराशा मनात होती. मात्र, स्वभावानुसार छायानं सकारात्मक विचार केला आणि यंदा रवी जाधव दिग्दर्शित “न्यूड” या चित्रपटातील भूमिकेसाठी छायानं सर्वोत्कृष्ट सहकलाकार पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या रुपानं मानाची बाहुली छायाच्या हाती विसावली.

पुरस्कार मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना छाया म्हणाली, ‘महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट सहकलाकारा’चा पुरस्कार मला मिळणं ही माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. दृष्ट लागू नये म्हणून घराघरात काळ्या बाहुल्या लावल्या जातात; पण आम्हा कलाकारांसाठी ही काळ्या बाहुलीची ट्रॉफी म्हणजे एक विशेष आकर्षण आहे. या पुरस्कारानं मागच्या वर्षी मला हुलकावणी दिली होती. पण यावर्षी हा पुरस्कार माझ्या हातात असताना माझा मित्रपरिवार-कुटुंबाच्या डोळ्यात माझ्याहीपेक्षा त्यांनाचं खूप आनंद झाल्याचं दिसतंय. माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम असणाऱ्या माणसांची जाणीव हा क्षण करुन देतो आहे, ह्यापेक्षा अजुन काय महत्वाचं असतं!’

‘न्यूड’चा दिग्दर्शक रवी जाधवनं खूप अडचणींना तोंड देत जिद्दीनं हा चित्रपट उभा केलाय. त्या पोर्ट्रेटमध्ये त्याला मी दिसणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या सहकलाकारांसह न्यूड मॉडेल्सनीही मला खूप शिकवलं. मला आठवतं, आम्ही एक सीन शूट केला होता. काही कारणाने तो फिल्मच्या फायनल कटमधे आला नाही; पण त्यात माझा एक डायलॉग होता. मी यमुनेला म्हणते, “यमुने पोराला जाऊ दे पिच्चरला. आपल्यासाठी पिच्चर म्हणजे एंटरटेन्मेंट नाई. पिच्चर आपल्याला जगायला बळ देतं.” मला अगदी हेच वाटतंय आज. चित्रपट, वेगवेगळ्या कलाकृती समाजातल्या तळागाळातल्या लोकांना जगण्याचं बळ देतात आणि मी त्या कलाकृतींचा एक भाग असल्याचा मला खूप आनंद आहे.’ असंही छायानं आवर्जून सांगितलं.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×