मुंबई : वसईतील एका तरुणीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. श्रद्धा वालकर असे मृत तरुणीचे नाव आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासातुन समोर आले आहे. घरच्यांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत राहायला आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे. तसंच मृतदेहाचे काही तुकडे हाती लागल्याची माहिती दिली आहे.
तब्बल ६ महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आले आहे. या एकूणच प्रकाराकडे सोशल मीडियावर ‘लव जिहाद’च्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सामान्य व्यक्तिपासून सेलिब्रिटीपर्यंत कित्येक लोक यावर बोलताना दिसत आहेत.
मराठी अभिनेत्री केतकी चितळेने या कृत्याचा निषेध केला आहे. अत्यंत कडव्या शब्दांत तिने याची निंदा केली आहे. पाठोपाठ आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणारे मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील याविषयी खेद व्यक्त केला आहे.
फेसबूकवरील एका यूझरची पोस्ट शेअर करत शरद पोंक्षे यांनी याबद्दल खेद व्यक्त केला आहे. “मुलींनी जागरूक व्हायला हवं” असा एक सल्लाच त्यांनी ही पोस्ट शेअर करताना दिला आहे. त्यांच्या या पोस्टवरही कित्येक लोकांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. काही महिला यूजर्सनी तर जरा नाही जास्तच जागरूक व्हायची गरज आहे असे कॉमेंटमध्ये लिहिले आहे. या प्रकरणात न्यायव्यवस्था आफताबला काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.