अभिनेता सलमान खानवर फसवणुकीचा आरोप; पोलिसांनी धाडले नोटीस

अभिनेता सलमान खान अर्थात बॉलिवूडचा सल्लू भाई हा आपल्या दिलदार स्वभावासाठी  सर्वपरिचित आहे. सलमान खानच्या दिलदारपणाचे अनेक किस्से तुम्ही सोशल-मीडियावर वाचले असतील. सलमानचे फॅन्स तर त्याच्या दातृत्वाचे नेहमीच तोंडभरून कौतुक करताना दिसतात. मात्र याच सलमान खानविरोधात आज चंदीगड पोलिसांत फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अभिनेता सलमान खान व त्याची बहीण अल्विरा यांच्याविरोधात चंदीगडस्थित व्यावसायिक अरुण गुप्ता यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सलमान खान व त्याच्या कुटुंबियांच्या मालकीची असलेल्या बिईंग-ह्युमन या कपडे व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपनीसोबत करार केला होता.

यानुसार गुप्ता यांनी तीन कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ते चंदीगड येथे बिईंग-ह्युमनचे एक शोरूम उभारणार होते. या शोरूममध्ये बिईंग-ह्युमन या कंपनीचे दागिने विकले जाणार होते. मात्र गुप्ता यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना कोणताही माल कंपनीतर्फे देण्यात आला नाही.

याबाबत त्यांनी स्वतः सलमान खान व बिईंग-ह्युमनचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बिईंग-ह्युमनच्या दागिने विक्री करणाऱ्या सहाय्यक कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली असता ती वेबसाईट आता बंद पडली असल्याचं निदर्शनास आलं.

अखेर या घटनेला दीड वर्ष उलटल्यानंतर व सलमान खान व बिईंग-ह्युमन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने पोलिसांमध्ये तक्रार केल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. याप्रकरणी आता चंदीगड पोलिसांनी सलमान खान यास नोटीस धाडले असून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.            

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.