मुंबई – अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सैफवर तत्काळ लीलावती रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, या हल्ल्यात सैफच्या पाठीत मणक्यापासून काही अंतरावर चाकूचा तुकडा अडकून होता. जो डॉक्टरांनी सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढला आहे. यामुळे त्याच्या जीवाला कोणताही धोका नसून प्रकृती स्थिर असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आली.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सैफच्या अंगावर चोरट्याने एकूण सहा वार केले होते. यापैकी एक वार स्पायनल कॉडची जी मुख्य रक्तवाहिनी होती तिच्या पासून 2 मीमीच्या दूर हा चाकूचा तुकडा अडकला होता. जर हा तुडका दोन मीमी जास्त आतमध्ये घुसला असता तर पॅरालिसिस होण्याची शक्यता होती, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
सैफ अली खानच्या मणक्याजवळ जो चाकूचा तुकडा अडकून होता, तो डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे. सैफ अली खानने शस्त्रक्रियेच्या वेळी आणि त्यापूर्वी चांगले धाडस दाखवले. रुग्णालयात दाखल होत असताना तो स्वत: चालत आला. त्याने स्ट्रेचर घेतले नाही. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगा होता. त्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. सध्या त्याच्या तब्येतीत सुधारणा असून तो आता चालूही शकतो.
आरोपीचा शोध सुरूच –
या हल्ल्यानंतर एका व्यक्तीला आज सकाळी ताब्यात घेण्यात आले. पण चौकशीनंतर त्याचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सोडण्यात आले. तसेच सैफवर झालेल्या हल्लाप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा ताब्यातही घेण्यात आले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिस, फॉरेंसिक लॅब यांच्याकडून कालच सैफच्या घराची तपासणी झाली आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.