मुंबई : स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘कहानी घर घर की’ आणि सोनी टिव्हीवरील ‘लज्जा’ मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सचिन कुमार याचे निधन झाले. अंधेरीतील त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
सचिन कुमार हा अभिनेता अक्षय कुमारचा आतेभाऊ होता. सचिनकुमार अवघ्या 42 वर्षांचा होता. सचिन कुमारचा अभिनेता मित्र राकेश पॉल याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना याविषयी माहिती दिली. सचिनच्या जवळच्या लोकांनी मला या दुर्देवी घटनेबद्दल सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले. गुरुवारी रात्री सचिन झोपण्यासाठी आपल्या बेडरुममध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही.
सचिनच्या आई-वडिलांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी सचिन त्यांना मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे सचिन कुमार याने काही वर्षापूर्वी अभिनयात यश न मिळाल्याने प्रोफेशनल फोटोग्राफी सुरु केली होती. यामध्ये तो आनंदी देखील होता. त्याच्या जाण्याने छोट्या पडद्यावरील हरहुन्नरी कलाकार हरवल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.