मुंबई – हिंदी चित्रपट अभिनेता राहुल रॉय याला आज कारगील येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान “ब्रेन स्ट्रोक’ झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राहुल त्याच्या “एलएसी – लाइव्ह द बॅटल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. कारगिलमध्ये अति थंड हवामानामुळे त्याला “ब्रेन स्ट्रोक’ आला. त्याचा भाऊ रोमर सेन याने या वृत्ताला दुजोरा दिला आणि राहुल रॉयला आता बरे वाटते आहे, असे सांगितले.
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या 1990 मधील “आशिकी’ या प्रणय कथेच्या सिनेमामुळे राहुल रॉय प्रकाशझोतात आला. त्यानंतर 2006 मधील “बिग बॉस’या रिऍलिटी शो चे विजेतेपदही त्याने जिंकले होते. त्याने इतरही काही चित्रपटांमध्ये छोटे-मोठे रोल केले होते.
त्यानंतर मात्र तो कायमच चर्चेपासून दूर राहिला होता. आपल्या अलिप्त राहण्याबाबत त्याने काही दिवसांपूर्वी स्पष्टिकरण दिले होते. “स्टार व्हावे, अथवा ऍक्टर म्हणून नाव कमवावे अशी आपल्याला अजिबात अपेक्षा नव्हती.
याबद्दल फिल्म इंडस्ट्रीलाही काहीही देणे-घेणे नव्हते.’ असे त्याने सांगितले होते. आपल्या वाट्याला येणाऱ्या भूमिकांबद्दल असमाधानी असल्याचेही त्याने म्हटले होते.