“तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्तानेला पत्नीसह अटक 

“पीएनजी ब्रदर्स’ची 25 लाखाहून अधिक फसवणूक केलेले प्रकरण : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी 

पुणे : औंध येथील “पीएनजी ब्रदर्स’ या नामांकीत सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल 25 लाख 69 हजार 960 रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणात “तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने (वय 56) आणि त्यची पत्नी सायलीला (वय 32, दोघेही, रा. धनकवडी) 21 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी (दि. 18) सकाळी पुण्यातील घरातून अटक केली.

याबाबत “पीएनजी ब्रदर्स’च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय 34, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दास्ताने दाम्पत्यविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दास्ताने याने औंध येथील आयटीआय रस्त्यावरील “पीएनजी ब्रदर्स’ सराफी पेढीमधील कर्मचाऱ्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तेथून वारंवार सोने-चांदीचे दागिने, बिस्कीटे आणि हिरे खरेदी केले होते.

त्यानंतर दास्ताने याने खरेदी केलेल्या दागिन्यांची काही प्रमाणात रक्कम दिली होती. मात्र उर्वरीत रक्कम आणि त्यावरील व्याज देण्यास दास्ताने हा वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होता. वारंवार मागणी करुनही दास्ताने पैसे देत नसल्याने याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली होती. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यावेळी गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिने हस्तगत करण्यासाठी, डोंबिवली येथील जमीन विक्री केल्यानंतर तीन कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातून पैसे देणार असल्याचे तो सांगत होता. खरेच त्याची डोंबिवली येथे जमीन आहे का, त्यांना पेढीतील कोणी मदत केली आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here