जम्पिंग जॅक’ जितेन्द्रचे 80 व्या वर्षात पदार्पण

सुपरहिट सिनेमांचा बादशहा होता ऐशीच्या दशकात

– कृपा देशपांडे, पुणे

जितेंद्र ज्याच्या वयाची थोडीथोडकी नव्हे तर १८ वर्षे चाळीतल्या एका चिंचोळ्या पॅसेज मध्ये गेली. कधीकधी चहा करायला चहा पावडर तर कधी दूध नसायचे पण शेजारी प्रेमाने उधारी द्यायचे. असा जिव्हाळा प्रेम कुठेच नाही मिळालेअसे तो म्हणतो. आज माझ्या शेजारच्या बंगल्यात कोण रहातय ते मला माहीत नाही! सुरवातीच्या कठीण दिवसांची प्रेमाने आठवण ठेवणारा जितूभाय सारखा कलाकार विरळाच!

जितेंद्रचे खरे नाव रवी कपूर. जन्म ७ एप्रिल १९४२, अमृतसर, पंजाब येथे झाला. काही काळाने हे कुटुंब मुंबईत गिरगाव येथील एका चाळीत रहात. त्याचे वडील आणि काका फिल्म इंडस्ट्रीमधील बहुतांश निर्मात्यांना इमिटेशन ज्वेलरी पुरवीत. “सेंट सॅबॅस्टीयन गोवन हायस्कूल” मध्ये जितेंद्र आणि राजेश खन्ना दोघेही शिकत होते नंतर “सिध्दार्थ” कॉलेजमध्ये त्याने आपले ग्रॅड्युएशन पूर्ण केले. पण जितेंद्र कॉलेज मध्ये असताना त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला तेव्हापासुन तो काकांना मदत करत असे.

एक दिवस तो व्ही शांताराम यांच्या ऑफिस मध्ये ज्वेलरी पोचवायला गेलेला असताना त्यांनी “नवरंग” चित्रपटात अभिनेत्री संध्या बॉडी डबल चा रोल करण्या साठी विचारले तसेच “सेहरा” मध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ऑडिशन साठी बोलावले. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या “गीत गाया पत्थरोंने” या चित्रपटात नायक म्हणून पाहिला ब्रेक दिला. त्यात नायिका त्यांची मुलगी राजश्री होती. पुढे त्यांच्या “बूंद जो बन गई मोती” ह्यात मुमताज नायिका होती. जितेंद्र आणि मुमताज हे दोघेही आधी ज्युनियर आर्टिस्टम्हणून सुरुवात करून खूप मेहेनतीने टॉपला पोचले.

जितेंद्रचा पहिला सुपर हिट झालेला चित्रपट निर्माता “रवी नगाईच” यांचा “फर्ज”, नायिका बबिता! . नंतर सुहागरात (राजश्री) औलाद (बबिता) मेरे हुजूर (माला सिन्हा) “जिगरी दोस्त (मुमताज, कोमल म्हणजे पूनम सिन्हा) जीनेकी राह (तनुजा) धरती कहे पुकारके (नंदा), मेरेहमसफर (शर्मिला), हिम्मत , हमजोली (लीना चंदावरकर) एक बेचारा (रेखा) हे सगळेच चित्रपट १९७०/७२ पर्यंतचे आणि बहुतेकांचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते.

नासिर हुसेन सुपर हिट “कारवा”, नायिका आशा पारेख, त्यानंतर दिग्दर्शक गुलजार यांचा थोड्या वेगळ्या पठडीतला “परीचय” हा चित्रपट आला. त्यानंतर “खूशबू” “किनारा” तसेच बासू चतर्जींचा “प्रियतमा” हे चित्रपटही आले ज्यात एक वेगळा, संयत अभिनय करणारा जितेंद्र आपल्याला दिसला. त्याची जंपिंग जॅक ही इमेज जरा बाजूला हटली. या इमेज breaking चे श्रेय गुलजार यांचेच!

तद्दन व्यावसायिक म्हणता येतील असे रुप तेरा मस्ताना, भाई हो तो ऐसा, एक हसीना दो दिवाने, जैसे को तैसा, बिदाई, उधार का सिंदूर,संतान, नागीन, स्वर्ग नरक, जानी दुश्मन इ. चित्रपट ही आले पण याच बरोबर . जे ओमप्रकाश यांचा अपनापन (रीना रॉय , सुलक्षणा पंडीत, संजीव कुमार) आणि “अर्पण”( रीना रॉय परवीन बाबी आणि राज बब्बर) “आशा”(रिना रॉय , रामेश्वरी) हे चित्रपटही उत्तम कथा, अभिनय यामुळे चांगलेच गाजले.

जितूभायच्या होम प्रॉडक्शन चा “दिदार ए यार” हा चित्रपट सपशेल आपटला आणि आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी त्यानै दक्षिणेचे चित्रपट स्विकारले. त्याच्या सुमारे २००/२२५ चित्रपटांपैकी ८० चित्रपट हे तेलगू चित्रपटांचे remake होते काही नावे vanagidakhl स्वर्ग नरक, तोहफा, मवाली, हिम्मतवाला, जुदाई, सिंदूर, इत्यादी.

काही म्हणा १९७० ते १९९० असे मोठे पर्व जितूभायनी स्वतःच्या जोरावर पेलले. बाबूभाई मिस्री दिग्दर्शित “हातिमताई” हा बहुदा त्याचा नायक म्हणून शेवटचा चित्रपट! त्यानंतर दिल आशना है, आंसू बने अंगारे, आदमी खिलौना है, जनम कुंडली, लव कुश अशा काही चित्रपटात चरित्र भूमिका ही केल्या. २००६ मधे आलेला भोजपुरी चित्रपट “गब्बरसिंग” हा त्याचा शेवटचा चित्रपट!

जितेंद्र आजही अगदी फीट आहे. त्याने त्याची जुनी मैत्रिण शोभा सिप्पी बरोबर लग्न केले. त्यांना एकता आणि तुषार ही मुले आहेत. एकताची “बालाजी टेलिफिल्मस” ही नामांकीत प्रॉडक्शन कंपनी असून बहुतेक प्रमुख चॅनेल्सवर तिच्याच सिरीयल्स चालू आहेत. तुषार पण अभिनेता आहे .
जितेंद्र अभिनयासाठी कधीच प्रसिध्द नव्हता. तरुणाईला त्याची स्टाईल, डान्सिंग स्टेपस, देखणा चेहेरा पसंत होता. व्हाइट पॅंट तसेच व्हाइट शूज हे फक्त त्यालाच शोभायचे. फर्ज चित्रपटातल्या “मस्त बहारोंका मैं आशिक मैं जो चाहे यार करु”..या गाण्यात त्यानी जी काही उछलकूद केली त्यावरून त्याला जंपिंग जॅक हे नाव लोकांनी बहाल केले होते.

एक सुखी समाधानी आयुष्याची वाटचाल तो त्याच्या कुटुंबा बरोबर करत आहे. त्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

– कृपा देशपांडे, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.