बंगळुरू : रेणुकास्वामी हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याला कारागृहात विशेष वागणूक दिल्या प्रकरणी मुख्य तुरुंग अधीक्षक व्ही सेशुमूर्ती आणि तुरुंग अधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. शहरातील परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात कॉफी हातात घेऊन धूम्रपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दर्शन थुगुदीप याला व्हीआयपी सेवा देण्यात ९ अधिकारी सहभागी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले. त्याच्या आधारे त्या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षाव्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी असल्याने आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी सांगितले.
या हत्याप्रकरणातील सहआरोपी आणि त्याचा मॅनेजर नागराज तसेच, विल्सन गार्डन नागा आणि खुल्ला सीना हे दोन गुन्हेगार दर्शनासोबत बसले आहेत. तर, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दर्शन एका व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल करताना दिसतो. या घटनेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर अनेकांनी दर्शनला विशेष वागणूक दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.