मुंबई – साऊथ स्टार अभिनेता अल्लू अर्जुन फक्त अभिनयासाठीच नाही तर आपल्या निर्णयांसाठी देखील प्रसिद्ध आहे. स्टायलिश पनासह माणुसकी जपणाऱ्या अल्लूचे अनेक किस्से इंडस्ट्रीमध्ये लोक चवीने सांगतात. लांबून सेल्फी घेणाऱ्या फॅन्सला जवळ बोलावून त्याच्या गळ्यात हात टाकून फोटो काढल्याचे अनेक प्रसंग इंटरनेटवर पाहायला मिळतात. सध्या अल्लू अर्जुनने एक मोठी जाहिरातीची ऑफर नाकारल्याचे समजते.
आर्या,बुमरेलु,पुष्पा असे अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अल्लूचे तेलगू तमिळसह बॉलिवूडमध्ये देखील प्रचंड फॅन्स आहेत.अल्लूने कोट्यवधींची मद्याची सरोगेट जाहिरात नाकारल्याचे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ही जाहिरात तब्बल १० कोटींपर्यंतची असल्याचे बोलले जात आहे. पण अल्लूने हा जाहिरातीस साफ नकार दिल्याचे समजते.
त्या मद्य ब्रॅण्डशी साऊथसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी जोडलेल्या आहेत तरीही अल्लू अर्जुनने ही जाहिरात न करण्याचा निर्णय घेताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ‘हमारा स्टार कैसा हो अल्लू अर्जुन जैसा हो’ अशा पोस्ट शेअर केल्या आहेत. या आधी देखील अल्लूने तंबाखूची जाहिरात करण्यासाठी नकार दर्शवला होता.
सर्वसामान्यांमध्ये असलेल्या चांगल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अल्लूने ही जाहिरात न केल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ ची सर्वांना प्रतीक्षा आहे. पुष्पाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता.