अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. अक्षय लवकरच आपला ड्रीम प्रोजेक्टवर काम करणार आहे. महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो झळकणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला एकेकाळी चंबळ खोऱ्यातील वाघ म्हणून कुख्यात असलेला माजी दरोडेखोर मल्खन सिंह याने इशारा दिला आहे.
मल्खन सिंह यांनी अक्षयला इशारा देत म्हणाले आहेत की, “राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या कथेमध्ये खेत सिंह यांना योग्य ते स्थान मिळायला हवे. पृथ्वीराज चौहान यांच्या मध्य प्रदेशमधील टीकमगढमधील कुंडार किल्ल्याची स्थापना महाराज खेत सिंह यांनी केली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेमध्ये त्यांना योग्य ते स्थान मिळालेच पाहिजे. जर या चित्रपटामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला नाही तर गरज पडल्यास न्यायालयात जाऊ’, असा इशारा मल्खन सिंह याने दिला आहे.
पुढे तो म्हणाला, “राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित चित्रपट तयार करण्यापूर्वी अक्षयने माझी भेट घेतली पाहिजे आणि खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे. जर अक्षयने असे केले नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेऊ’. दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती यश राज फिल्म्सअंतर्गत करण्यात येणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. हा चित्रपट 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.