मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासात करोनाचा शिरकाव झाला असून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सध्या उपचार घेत असून, असे असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमिर खानलाही करोना झाल्याचे समोर आले आहे.
आमिर खानच्या प्रवक्त्याने याविषयी माहिती दिली. “आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचे पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” असे प्रवक्त्याने म्हटले आहे.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते. त्यामुळे आता आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही करोना चाचणी करावी लागू शकते.