पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – पुण्यात जेव्हा करोनाची साथ सुरू झाली, तेव्हा कष्टकरी कामगारांनी रजा काढल्या नाहीत किंवा पळूनही गेले नाहीत. त्यांनी कामावर उपस्थित राहून शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला.
कष्टकरी बांधव तोंडावर मास्क ठेवून कामावर येत होते. माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीदरम्यान आणि गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवणाऱ्या ४०० हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच वंचित आणि उपेक्षितांसाठी संस्था चालविणाऱ्या संस्थाचालकांचा देखील सन्मान करण्यात आला.
या वेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विक्रम खन्ना, सूरज थोरात, राजेश कारळे उपस्थित होते. सन्मान सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.
कष्टकरी वर्गाचा सन्मान करून मंडळ विधायक काम करत आहे. सत्कार घ्यायला ज्या भगिनी आलेल्या आहेत, मंडईच्या पायाची जमीनसुद्धा त्यांच्या नावाची आहे.
कष्टकरी कचरा उचलतात, ते महापालिकेचे नोकर नाहीत. काच, प्लॅस्टिक, लोखंड गोळा करून पुनर्निर्मिती होते आणि त्यातून त्यांच्या पोटाला आधार मिळतो, असे डॉ. आढाव म्हणाले.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत आणि विसर्जन मिरवणुकीनंतर देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण शहर स्वच्छ राहते. कोणतीही रोगराई न पसरण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाला खूप महत्त्व आहे.
एक दिवस त्यांनी सफाई केली नाही, तर शहराची काय अवस्था होईल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या कष्टकरी वर्गाच्या कामाचे मोल लक्षात घेऊन मागील २७ वर्षांपासून त्यांचा सन्मान गणेशोत्सवानंतर करण्यात येतो, असे थोरात यांनी नमूद केले. सराफ यांनी सूत्रसंचालन केले.