Palghar : पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात मंगळवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या भीषण मारहाणीत एका आरटीआय कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर महसूल विभागातील मंडळ अधिकारी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी (सर्कल अधिकारी) प्रभाकर पाटील आणि आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील हे शिरगाव परिसरातील एका खाणीच्या ठिकाणी शासकीय कामासाठी गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तींच्या टोळीने त्यांना अडवून काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच मंडळ अधिकाऱ्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रभाकर पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा हल्ला पूर्वनियोजित होता का, तसेच त्याचा संबंध शासकीय कारवाई, जमीन वाद किंवा खाण व्यवसायाशी आहे का, या सर्व अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर शिरगाव परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.