- 7 फेब्रुवारीला एकाच वेळी 100 उपग्रह सोडले
हिंजवडी – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, द मार्टिन ग्रुप आणि स्पेस झोन इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस रिसर्च पेलोड क्यूबज चॅलेंज 2021 चे आयोजन केले होते. 7 फेब्रुवारीला रामेश्वरम येथून हेलिअम बलून मार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह सोडण्यात आले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी खगोलीय ज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्वप्नपूर्ती विद्यार्थ्यांनी बनविलेले 100 उपग्रह रविवारी (7 फेब्रुवारी) एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात आले. हे उपग्रह बनविण्यासाठी मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण येथील आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
7 फेब्रुवारी रोजी रामेश्वरम टीव्ही टॉवर येथे झालेल्या प्रेक्षपण कार्यक्रमासाठी तेलंगाणाच्या राज्यपाल डॉ. तमिलसाई सौंदरराजन, डीआरडीओचे माजी महानियंत्रक पद्मभूषण डॉ. ए. एस. पिल्लई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेक्षपण कार्यक्रम संपन्न झाला.
जगात सर्वांत कमी वजनाचे (25 ग्रॅम ते 80 ग्रॅम) 100 उपग्रह बनवून आणि त्यांना 35000 ते 38000 मीटर उंचीवर अल्टीट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले आहेत. या केससोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाइव्ह कॅमेरा लावलेला आहे. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीतील केंद्राला पाठवतील व पेलोड सोबत काही झाडांचे बीजसुद्धा पाठवण्यात येत आहे. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल.
बाल संशोधकांचा पहिलाच उपक्रम
भारतात प्रथमच बाल संशोधकांकडून अशा प्रकारचा उपक्रम राबविला गेला. 100 उपग्रहांपैकी 38 उपग्रह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटांनी बनविले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण येथील गणेश बाबू निम्मणवाड, गायत्री अंकुश कुंभार, चैतन्य सतीश शिंदे, मारुती वानखेडे, राखी राजेंद्र राकांवत, योगिता शिवाजी फड, प्रज्ञा सखाहरी हाळीकर, सिद्धेश नानासाहेब शिंदे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
हे उपग्रह बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण झाले आहे. प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याचे एकदिवसीय प्रशिक्षण 19 जानेवारी 2021 रोजी जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ हडपसर येथे झाले.
माण शाळेच्या विद्यार्थ्यांना द मार्टीन ग्रुप मुंबईने प्रायोजित केले. मुख्याध्यापक आत्माराम वाघमारे, वर्गशिक्षक रामदास वाव्हळ, सुनीता बोडके, प्रीती पंडित यांनी परिश्रम घेतले.
मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित गवारे, उपाध्यक्ष पांडुरंग महाडीक, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
उपग्रह निर्मिती कार्यशाळेमुळे आम्हा विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. अंतराळ कार्यक्रमाची आवड निर्माण झाली.
– गणेश निम्मणवाड, विद्यार्थी.लॉकडाऊन कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षणासोबत सहशालेय उपक्रम म्हणून उपग्रह निर्मिती कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग हा इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. उपग्रह, अंतराळ कार्यक्रमाची आवड निर्माण झाली.
– आत्माराम वाघमारे
मुख्याध्यापक प्रा. शाळा माण