बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी न घेतलेल्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

पुणे – कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी न घेतलेल्या महाविद्यालयांची विशेष पथकामार्फत तपासणी करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला आहे.

विज्ञान शाखेतील विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता केवळ प्रात्यक्षिकांच्या वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्‍लासेसला उपस्थित राहतात. काही महाविद्यालयांनी यासाठी खासगी क्‍लासेस बरोबर सामंजस्य करार केला आहे. याबाबतच्या तक्रारी अनेकदा प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेत विधीमंडळ सदस्यांनी सन 2018 मध्ये वेळोवेळी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानुसार प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 15 जून 2018 रोजी घेतला होता.

माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी या महाविद्यालयांना आकस्मिक भेट देऊन बायोमेट्रीकच्या उपस्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करा, असेही शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पुणे शहरातील बहुसंख्य महाविद्यालयांनी शासनाच्या आदेशाची पायमल्लीच केली असल्याची बाब उघडकीस आली आहे, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया, पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रभारी सचिन पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र बनसोडे, शैलेश विटकर, रुपेश घोलप यांनी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अनेकदा केली आहे.

या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन चर्चा केली. बायोमेट्रीक हजेरीबाबतचे आदेश न पाळणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी. अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून संबंधित महाविद्यालये वगळण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, शिक्षण आयुक्तांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विशेष तपासणी पथकाची नियुक्ती
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पथकामार्फत महाविद्यालयांनी अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवालही शिक्षण आयुक्तांकडे सादर करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे लेखी पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागाचे शिक्षण उपसंचालक सुरेश माळी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.