सैदापूर ग्रामपंचायतीवर होणार कारवाई

कृष्णा-कॅनॉलमध्ये सोडले दूषित पाणी; स्थानिक नागरिकांची पोलिसांकडे धाव

कराड – विद्यानगर-सैदापूर मधील अनेक सोसायट्यांचे ड्रेनेज थेट कृष्णा कॅनॉलमध्ये सोडण्यात आल्याने दूषित पाण्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने काहीजणांनी पोलिसांकडे धाव घेतली असल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

विद्यानगर परिसरात शिक्षणाची सर्व सुविधा असल्याने अनेक खेडोपाड्यातून तसेच विविध भागातील लोकांनी येथे वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील अनेक समस्याही वाढू लागल्या आहेत. कचरा व्यवस्थापना बरोबरच पाणी व सांडपाण्याचा येथे मोठा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न मिटविण्याऐवजी त्याला वेगळी वाट दाखवली जात असल्याने सांडपाण्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. विद्यानगर सैदापूर मधील अनेक सोसायट्यांचे ड्रेनेज थेट कृष्णा कॅनॉलमध्ये सोडण्यात येत असल्याने अनेक प्रश्‍न उद्‌भवू लागले आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन लोकांच्या आरोग्याचा व शेतीचा मोठा प्रश्‍नावर तात्काळ मार्ग काढावा अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने वेळोवेळी सूचना करूनही सैदापूर ग्रामपंचायतीने त्या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे. खोडशी बंधाऱ्यातून सुरू झालेला कृष्णा कालवा हा सातारा व सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्‍यातील 34 गावातून वाहत जाऊन येरळेला मिळतो. सुमारे 86 किमी लांबीच्या या कॅनॉलवर शेती, शेतकऱ्यांचे जीवन व आरोग्य अवलंबून आहे. 34 गावे व 7 हजार पाचशे हेक्‍टर शेती क्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. असे असताना सैदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक सोसायट्यांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कॅनॉलमध्ये सोडण्यात आले आहे.

चोवीस तास ड्रेनेजचे पाणी कृष्णा कॅनॉलमध्ये मिसळत आहे. त्यामुळे संपूर्ण कॅनॉलच दूषित झाला आहे. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही बदलला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार आंदोलन केले आहे. मात्र, ग्रामपंचायतीने कोणावरही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्‍त होत आहेत. यामध्ये सर्वांची मिलीभगत असण्याची शक्‍यता नागरिकांमधून व्यक्‍त केली जात आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने मागील वर्षी पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार करून संबंधितांवर कारवाई करावी, असे सुचविले होते. मात्र यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

ग्रामपंचायत प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. माहिती अधिकाराच्या खाली स्थानिक नागरिक व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. मंत्रालयामार्फत याबाबतच्या तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्याही हालचालींना वेग आला आहे. परिणामी ग्रामपंचायतीच्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

विद्यानगरीतल्या प्रश्‍नांमध्ये वाढ…

शिक्षणाचे माहेरघर म्हणून विद्यानगर परिसराला ओळखले जाते. येथे असणाऱ्या शिक्षणातील सुविधांमुळे अनेक ठिकाणांहून लोकांनी येथे वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. शैक्षणिक सुविधांबाबत विद्यानगरीला ओळखले जात असली तरी येथे सविधांबरोबरच समस्याही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्या समस्या सोडविण्याऐवजी त्याला आणखी वाटा देण्याचे प्रकार येथील प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह इतर प्रश्‍न वाढू लागले आहेत. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here