अपात्र असूनही धान्याचा लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई

मल्हारपेठ -अन्नसुरक्षा योजना कायदा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य मिळते. मात्र त्यासाठी उत्पन्नाची अट असून यात न बसणारे अनेक लाभार्थी अपात्र असूनही धान्याचा लाभ घेत आहेत. त्यांनी स्वतःहून हा लाभ सोडणे गरजेचे असताना टाळाटाळ केली जाते.

 मात्र पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी आता अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम हाती घेतली असून जे अपात्र असतील त्यांचा लाभ तात्काळ बंद केला जात आहे. नुकतीच मल्हारपेठ येथे कारवाई करून पंधरा लाभार्थ्यांचे धान्य बंद केले आहे ही मोहीम अशीच चालू राहणार असून अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ सोडावा असे आवाहन तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी केले आहे.

अन्नसुरक्षा योजना कायदा अमलात आल्यापासून गावागावातून उत्पन्न गटाच्या मर्यादेनुसार पात्र लाभार्थ्यांची यादी केली असून त्यानुसार गावातील लोकसंख्येच्या 76 टक्के लोक धान्य घेण्यास पात्र ठरले असून 24 टक्के लोक उच्च उत्पन्न गट वर्गातील म्हणून गणले जाऊन त्यांना या योजना याचा लाभ मिळत नाही.

मात्र सन 2013 साली झालेल्या सर्व्हेनुसार आजही वाटप केले जाते. वास्तविकपणे कालांतराने प्रत्येक गोष्ट बदलत असते त्याप्रमाणे उच्च उत्पन्न गट वर्गातील व्यक्ती खालच्या पातळी जाऊ शकते तर जो कमी उत्पन्न गट वर्गातील आहे तो उच्च उत्पन्न गट वर्गातील व्यक्ती होऊ शकतो. असे बदल होत असले तरी त्याची परिस्थिती सुधारलेली असते त्याने त्यांनी स्वतःहून धान्याचा लाभ सोडणे अपेक्षित असते.

त्यासाठी एक स्वयंघोषणा पत्र लिहून दिल्यास ते या योजनेतून बाहेर पडू शकतात आणि ज्याला धान्याची गरज आहे त्याला या योजनेत समाविष्ट करून घेऊन घेता येऊ शकते. मात्र पुरवठा शाखेकडे केवळ धान्य मागायला येणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली असून धान्याचा लाभ सोडणारे कोणीही फिरकत नाही. वास्तविकपणे नोकरदार वर्ग, पेन्शनधारक, पाच एकरपेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी, चार चाकी वाहन धारक, व्यवसायिक अशा व्यक्तींचे उत्पन्न निश्‍चितच जास्त असते त्यांनी धान्याचा लाभ सोडणे गरजेचे आहे .

आणि गरिबांना धान्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र याबाबत उच्च उत्पन्न गट वर्गातील व्यक्ती गांभीर्याने घेत नाहीत त्यांच्याविरुद्ध पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी आता एक चांगलीच कारवाईची मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून या पाहणीमध्ये व्यक्ती अपात्र असूनही लाभ घेताना दिसतील त्यांना तात्काळ या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे व त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याचा विचार करून अपात्र लोकांनी तात्काळ या योजनेतून बाहेर पडणे गरजेचे आहे.

याबाबत तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अनेक गावातून स्वस्त धान्याचा लाभ मिळावा अशी मागणी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन कोण सबल व दुर्बल आहेत याचा आढावा घेतला पाहिजे. सबल असणाऱ्यांची तक्रारी येतील अशा ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली जाणार असून जे व्यक्ती अपात्र असून देखील धान्याचा लाभ घेत असतील त्यांना तात्काळ जागेवरच या सुरक्षा योजनेतून बाहेर काढले जाणार आहे. त्यामुळे अपात्र लोकांनी स्वतःहून स्वयंघोषणा पत्र देऊन या योजनेतून बाहेर पडावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.