प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – केंद्रीय स्तरावरही प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणण्यात आल्यानंतर पुणे महापालिकेने नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्र केली आहे. दि. 1 ते 31 जुलै दरम्यान पालिकेने 205 प्रकरणांमधून 10 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यातील सर्वाधिक पावणेदोन लाख रुपयांचा दंड नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने वसूल केला आहे.
एखाद्या व्यक्तीकडून पहिल्यांदा प्लॅस्टिकबंदीचा भंग झाल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा भंग झाल्यास दहा तर तिसऱ्यांदा भंग झाल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवास अशी तरतूद आहे. त्यानुसार एकूण 205 प्रकरणांमध्ये 2 हजार 364 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
दरम्यान, केंद्रानेही प्लॅस्टिक बंदी लागू केल्यानंतर पालिकेने धडाक्यात कारवाई सुरू केली होती. पहिल्या काही दिवसांत दंड वसूल केला गेला. आता शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर होतच आहे. त्यामुळे पालिकेने कारवाईत सातत्य राखण्याची गरज आहे.
नगर रस्त्यावर सर्वाधिक दंड वसूल
नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक 1 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. औंध-बाणेर – 1 लाख 10 हजार रुपये, घोले रस्ता-शिवाजीनगर-90 हजार रु. तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेमलेल्या प्लॅस्टिक पथकाने 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाने सर्वांत कमी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जनजागृती सुरू, प्रतिसादाची गरज
महापालिकेतर्फे सातत्याने प्लॅस्टिकबंदीबाबत जागृती केली जात आहे. नागरिकांनीही पुढाकार घेऊन बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या-वस्तू मागू नयेत आणि देणाऱ्यांनाही विरोध करावा. अन्यथा पालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिला आहे.