डास उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याने ठेकेदाराला ठोठावला दंड
पिंपरी – महामेट्रोच्या वतीने शहरात मार्गिका-एकचे काम सुरु आहे. मेट्रोचा प्राधान्य मार्ग हा पिंपरी-चिंचवड शहरातच असल्याने काम खूपच वेगात सुरु आहे. परंतु काम करत असताना आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथील कॉस्टींग यार्डमधील लेंबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महामेट्रोच्या ठेकेदार एन. सी. सी. या कंपनीस 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
शहरातील पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट अशा 7.50 किलोमीटर अंतरावर काम सुरू आहे. मेट्रो स्पॅनसाठी सेगमेंटची निर्मिती नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथे केली जात आहे. याच ठिकाणी मेट्रोचा लेबर कॅम्प आहे. त्या ठिकाणी तपासणी केली असता डास उत्पत्ती होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागास आढळून आले.
त्यामुळे पालिकेच्या पथकाने महामेट्रोच्या एनसीसी या ठेकेदारास 15 हजारांचा दंड केला आहे. डास उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे बजावण्यात आले आहे. याच कॉस्टींग यार्डमधून राडारोडा पवना नदी पात्रात टाकला जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पालिकेने व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने महामेट्रोला नोटीस बजावली होती. त्यामुळे महामेट्रोने तातडीने नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला होता. तसेच, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती.
ठिकठिकाणी साहित्य पडून
मेट्रोच्या कामासाठी दापोडी ते चिंचवडपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी साहित्य पडून आहे. अनेक महिन्यांपासून हे साहित्य न हलविल्याने पडलेल्या पावसाचे पाणी येथे साचले असल्याचे दिसून येत आहे. तसेच, मेट्रोने अनेक ठिकाणी खड्डे घेतले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होत आहे. त्यामुळे त्या भागांतील रहिवाशी, वाहनचालक आणि मेट्रोच्या कामगारांना डास चावून विविध आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहीम राबवून महामेट्रोवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.