श्रीनगर – राजकारणात प्रवेश केलेले माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्यावर जम्मू काश्मीर प्रशासनाने पीएसए म्हणजेच पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट खाली कारवाई केली आहे. गेले काहीं दिवस फैजल हे स्थानबद्धतेत आहेत. त्यांच्यावर शुक्रवारी रात्री पीएसए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आदि नेत्यांवर सरकारने याच वादग्रस्त कायद्यान्वये कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करून ठेवले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या स्थानबद्धतेच्या कारवाईची मुदत 6 फेब्रुवारीच्या रात्री संपत असताना त्यानंतर काही तासातच त्यांच्यावर पीएसए अंतर्गत कारवाई करून त्यांच्या स्थानबद्धतेची मुदत वाढवली आहे.
या कायद्या अंतर्गत कोणालाही कोणत्याही खटल्याशिवाय दोन वर्षांपर्यंत स्थानबद्ध करून ठेवण्याचा सरकारला आधिकार आहे. त्या अधिकाराचा दुरूपयोग केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पण त्या आरोपाकडे सरकारने अद्याप लक्ष दिलेले नाही.
फैजल हे 13 ऑगस्टच्या रात्री विमानाने इस्तांबुल कडे जात असताना त्यांना विमानतळावर ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले आहे. शाह फैजल यांनी अलिकडेच प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन जम्मू काश्मीर पिपल्स मुव्हमेंट नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.