शिवणेतील अनधिकृत बांधकामे पालिका करणार जमीनदोस्त
पुणे – एनडीएच्या सिमाभिंतीजवळील शिवणे आणि देशमुखवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला स्थानिकांनी विरोध केला. तसेच, अतिक्रमण विभागाच्या मार्गात ट्रक उभे करून मार्ग अडविला. त्यामुळे पथकाला कारवाई विनाच परतावे लागले. त्यामुळे आता कारवाईसाठी प्रशासनाने थेट राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ)ची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून 500 पोलिसांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. ही दोन्ही गावे दोन वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. मात्र, ही गावे पालिकेत येण्याची शक्यता असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे उभी राहिली आहेत. तसेच, अनेक परवानगी विनाच केली आहेत. त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाईची मोहीम हाती घेतली.
रस्त्यात ट्रक उभे करत पथकाचा मार्ग रोखला
कारवाईची सुरुवात मागील आठवड्यात शिवणे येथून करण्यात येणार होती. त्यासाठी पालिकेकडून मोठ्या प्रमाणात गुप्तताही पळली होती. मात्र, पालिकेचे पथक कारवाईसाठी महाकाय “जॉ’ कटर घेऊन पोहोचताच या बांधकाम व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांनी त्यास जोरदार विरोध केला तर पालिकेच्या पथकाच्या रस्त्यात ट्रक उभे करत रस्ताच बंद केला. पोलिसांकडून यावेळी कारवाईसाठी ट्रक हटविण्याचा प्रयत्न झाला.मात्र, नागरिकांनी त्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे महापालिकेस काहीच कारवाई न करता मागे फिरावे लागले. त्यामुळे आता पालिकेने ही कारवाई करण्यासाठी थेट “एसआरपीएफ’ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बांधकाम विभागाने नुकतेच पत्र पाठविले असून बंदोबस्त उपलब्ध होताच या भागातील इमारती जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले.