सातारा पालिकेची नळ तोड कारवाई जोमात

मोने कॉम्प्लेक्‍समधील नळ कनेक्‍शन तोडले

सातारा -पाण्याचा अपव्यय करणाऱ्या कमानी हौदानजीक असणाऱ्या मोने कॉम्प्लेक्‍समधील नळ कनेक्‍शन रविवारी तोडण्यात आले. पाणीपुरवठा विभागाची नळ तोड कारवाई सातत्याने सुरूच राहिली आहे. पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर आणि त्यांच्या पथकाने शाहू चौक-बोगदा-समर्थ मंदिर चौक ते मोती चौक- राजपथ ते शाहू चौक अशी पाहणी केली.

पाणी गळती होणारे आठ लिकेज पॉईंट या दरम्यान शोधून काढण्यात आले. साताऱ्यात हलक्‍या पावसाने सुरुवात केली तरी कास तलावाचा पाणीसाठा चार फुटांवर सरकलेला नाही. पाणी अपव्ययाच्या विरोधात सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची नळ तोड मोहीम सुरू असल्याने पाण्याची नासाडी करणाऱ्या नाठाळांना चांगलाच चाप बसला आहे.

कमानी हौदालगतच्या मोने कॉम्प्लेक्‍समध्ये मुख्य लाईनवरून चार कनेक्‍शन देण्यात आली आहेत. यातील एका कनेक्‍शनची गळती प्रचंड असल्याने संबधितांना समज देण्यात आली होती. मात्र, त्यांनी टाळाटाळ केल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टॅप मारून ते नळ कनेक्‍शन बंद केले.

साताऱ्यात गेल्या आठवडाभरात नळतोडीच्या सोळा कारवाया झाल्या आहेत. आंबेकर यांनी घंटेवारीची नोंद ठेवायला सुरुवात केली. शाहू चौक ते बोगदा व राजवाडा ते नगरपालिका या दोन मार्गावरील गळतीची आठ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांचे पॅचिंग होण्यापूर्वीच या गळती तातडीने काढण्यात येणार.

यामध्ये मानस हॉटेलसमोरील गळतीचाही समावेश आहे. या गळतीतून दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. ही गळती सोमवारी सकाळी तातडीने काढण्यात येईल, असे श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)