दोन महिन्यांत 2 हजार किलो जप्त सव्वाचार लाख दंड वसूल
276 जणांकडून दंड वसूल
महापालिकेच्या घनकचरा विभागाने 1 मार्च 2019 पासून 4 मे 2019 पर्यंत शहरातील विविध भागांत कारवाई मोहीम राबवून 276 जणांकडून 4 लाख 38 हजार 40 रुपये दंड वसूल केला आहे. या कारवाईत 2 हजार 132 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. मार्च महिन्यात 22 जणांवर कारवाई करून 96 हजार तर एप्रिल महिन्यात 46 जणांवर कारवाई करून 1 लाख 92 हजार 300 रुपये दंड वसूल केला. प्रशासनाने 3 मे रोजी एका दिवसात तब्बल 174 वापत्या करून 1 लाख 23 हजार 540 रुपये दंड वसूल करण्यात आला.
पुणे – महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये दोन महिन्यांत केलेल्या कारवाईमध्ये 276 व्यावसायिकांवर कारवाई करून 2 हजार 132 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. तसेच, या कारवाईतून 4 लाख 38 हजार 40 रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य सरकारने संपूर्ण प्लॅस्टीक बंदीची घोषणा केल्यानंतर 18 मार्च 2018 पासून अद्यादेशाद्वारे राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केली. त्यापूर्वी महापालिकेकडून शहरात 50 मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर कारवाई केली जात होती. राज्य शासनाने बंदी जाहीर केलेल्या तारखेपासून पुढील तीन महिने प्लॅस्टिकची विक्री आणि वापर करू नये, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीनंतर 23 जून 2018 नंतर दंडात्मक कारवाई करण्याला सुरुवात झाली. या कारवाईत प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांकडून 5 हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.