फ्लेक्स विजतारांवर पडल्याने 245 ठिकाणी वीजपुरवठा खंडित
नगर: वादळी पावसाने नगर जिल्ह्यात फ्लेक्स (फलक) आणि फ्लेक्स लावण्यासाठीचा आराखडा (स्ट्रक्चर) पडून जवळपास 240 ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे यापुढील काळात फ्लेक्स पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधितांवर कारवाई करून नुकसान भरपाई वसूल करण्याची कार्यवाही महावितरणकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.
गेल्या आठ दिवसांपासून नाशिक आणि नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. विजतारांवर वृक्ष उन्मळून पडणे, झाडांच्या मोठ्या फांद्या पडणे याशिवाय फ्लेक्स आणि ते बसविण्यासाठीचे स्ट्रक्चर विजतारांवर पडून वीज पुरवठा बाधित होण्याच्या घटना यावर्षी प्रकर्षाने पुढे आल्या आहेत. फ्लेक्सच्या कारणाने गेल्या पाच दिवसात नाशिक परिमंडळात जवळपास 240 ठिकाणी वीज पुरवठा यंत्रणा बाधित झाली आहे. उच्चदाब वीज वाहिन्यांवर फ्लेक्स किंवा त्यांचा आराखडा पडल्याने दोन उपकेंद्र बंद होण्याचे प्रकार घडले आहेत. दोन्ही खांबांमधील तारांवर अडकलेले फ्लेक्स काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, किंबहुना तशी यंत्रणा तातडीने उपलब्ध होत नसल्याने पुरवठा बाधित राहण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे यापुढील काळात फ्लेक्स किंवा तो बसविण्यासाठीचा आराखडा पडून वीजपुरवठा खंडित झाल्यास संबधित फ्लेक्स बसविणाऱ्या एजन्सीच्या मालकावर कारवाई करून महावितरणचे झालेले नुकसान वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
वीज यंत्रणेवर फलक, केबल टाकू नका
वीज वितरण यंत्रणांवरून केबल टाकणे, वीज खांबांवर फलक लावणे याबाबी अनधिकृत आहेत. यातून वीज वितरण यंत्रणा आणि नागरिकांच्या जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. संबंधितांनी याची दखल घेऊन वीज वितरण यंत्रणांवर केबल टाकणे किंवा फलक लावणे टाळावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.