पारनेर – वनकुटे ते तास येथे ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या साइडपट्ट्या भरण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्या साइडपट्ट्यावर टाकण्यात येणारा मुरूम हा अवैधरित्या उत्खननाने आणण्यात येत होता.
संबंधित उत्खनन करणारे पोकलेन तहसीलच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील सरकारी गट नंबर 87/1 मालकीच्या क्षेत्रातून कॉन्ट्रॅक्टर महेश गुंदेचा यांच्या मालकीचे पोकलॅन्ड व हायवा यांनी अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक सुरू होती, ही माहिती गुप्त बातमीदारामार्फत पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांना समजल्यानंतर त्या वनकुटे येथील अवैध उत्खनन सुरू असणाऱ्या ठिकाणी पोहचल्या.
तहसीलदारांनी चौकशी केली असता कॉन्ट्रॅक्टदार यांनी आम्ही रॉयल्टी काढली असून सरपंचांनी आम्हाला या जागेतून मुरूम आणायला सांगितला आहे, असे सांगितले. मात्र तहसीलदारांनी हे उत्खनन सरकारी जागेत असल्याने व त्यासंदर्भात परवानगी घेतली नसल्याने कारवाई केली असल्याची माहिती दिली.