हॉटेल प्यासावर कारवाई; हुक्का व विदेशी मद्यासह सव्वा लाखाचा माल जप्त

पुणे – शहरातील शुक्रवार पेठेतील हॉटेल प्यासावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अवैध्यपणे हुक्का पार्लर चालवणे तसेच रस्त्यालगत मद्य विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मद्य आणी हुक्‍याच्या साधनासह 1 लाख 19 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मद्यपींना 24 तास सेवा देणारे हॉटेल म्हणून प्यासा प्रसिध्द आहे. शहराचा पोलीस आयुक्त कोणीही असो प्यासा 24 तास सुरुच असायचे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी मात्र प्यासावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार प्यासा हॉटेलचे मनोज शेट्टी यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्यासा हॉटेलचे मॅनेजर मनोज शेट्टी हे अवैध्यपणे हुक्का पार्लर चालवत होते. तसेच रस्त्यालगतच मद्यविक्रीचे वेगळे काऊंटर बनवून तेथे विनापरवाना मद्यविक्री करत होते. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर तंबाखू सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्यासा हॉटेल मंडई चौकातच आहे तसेच हॉटेल समोर पीएमपी बस थांबा आहे. या थांब्यावरील प्रवाशांना तसेच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मद्यपींना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. तर दुसरीकडे हॉटेलमध्ये काही वर्षापुर्वी एकाचा खून झाला होता. तसेच अधून मधून मद्यपींची भांडणेही अनेकदा होतात. खडक पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हे हॉटेल आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपायुक्त नारनवरे यांची ही तीसरी धडक कारवाई आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.