राज्यात 97 खासगी बसेसवर कारवाई

पुणे – राज्यातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसवर होणाऱ्या कारवाईने दिवसेंदिवस जोर धरला आहे. परिवहन कार्यालयांकडून एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 97 वाहने वाहतूक नियमांचा भंग करताना आढळून आल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्यामधील प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसने नियम न पाळल्याच्या अनेक तक्रारी परिवहन कार्यालयाकडे येतात. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांच्याकडून मोटार वाहन कायदा आणि नियमांतर्गत परवाना आदी विषयक अटींचा भंग होणे, प्रवासी बसेसमधून मालवाहतूक करणे, जादा भाडे आकारणे आदी तक्रारी परिवहन विभागाकडे केल्या जातात. या तक्रारींबाबत राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याची दखल घेतली असून वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.

परिवहन आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी शहराच्या विविध परिसरांमध्ये करण्यात आली. त्यानुसार कार्यालयाने एप्रिल महिन्यामध्ये सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, नाशिक रस्ता आणि मुंबई रस्ता या ठिकाणी तीन वायुवेग पथकातील सहा मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पथकाकडून 395 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 97 वाहनांनी नियम न पाळल्याचे आढळून आले. नियमभंग करणाऱ्या वाहनांपैकी 68 वाहने जप्त केली आहेत. ही वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पीएमपीएमएल आणि एसटी डेपो येथे ठेवण्यात आली आहेत.
कारवाईतील 48 वाहनधारकांकडून 21 लाख 35 हजार 114 रुपयांचा कर आणि 6 लाख 24 हजार 800 रुपयांचा दंड असा एकूण 27 लाख 59 हजार 914 रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस वाहतूकदारांनी आपले वाहन सुस्थितीत असल्याची आणि वाहनाची कागदपत्रे वैध असल्याची खात्री करावी. नियमांचे पालन केल्याने वाहनांवर होणाऱ्या कारवाईची शक्‍यता कमी होते.
– संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.