सव्वा महिन्यात 55 वाहनांवर कारवाई

पीएमपी, पोलिसांचे संयुक्‍त पथक : महसुलात एक लाखाची वाढ

पिंपरी – सतत पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या टिकेची धनी ठरत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रयत्नांना थोडेफार का होईना यश मिळतांना दिसत आहे. पीएमपी व पोलीस यांच्या संयुक्‍त पथकाने बस मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर चाप बसवण्यास सुरवात केली आहे. गेल्या सव्वा महिन्यात विविध भागातील 55 अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. याचा थेट फायदा पीएमपीच्या महसूलात होत असून रोजचा महसूल एक लाखांनी वाढला असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 31 लाखांचा महसूल हा 32 लाखांपेक्षा अधिक झाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून मिळाली आहे.

शहरात “पीएमपी’च्या मार्गावर इतर अवैध वाहनांची संख्या वाढली होती, या वाहनांकडून अनेकदा बस थांब्यावरील प्रवासी नेण्यात येतात. त्यामुळे “पीएमपी’चा तोटा वाढत होता. वाहकांना त्याबाबत विचारण्या केल्यानंतर या अवैध वाहनांचे प्रमाण आणि मार्गावरील खासगी वाहनांतून होणारी वाहतूक वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार बस मार्गावरील या वाहनांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. सहा मे पासून हे पथक कार्यरत झाले आहे. शहरात प्रथम टप्प्यात सहाआसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षा यावर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यापुढील तपासणीत मोटारी, जीप, टॅम्पो ट्रव्हलर आणि कंपन्यांच्या खासगी बसेसही वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 55 वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात पिंपरी, नेहरुनगर, भोसरी, स्पाईन रस्ता, टेल्को कंपनी, भूमकर चौक, शिवाजी चौक, देहूगाव या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता चिखली, कुदळवाडी, जगताप डेअरी, विठ्‌ठलवाडी, चिंचोली, शेलारवस्ती या ठिकाणी कारवाईचा वेग वाढवला आहे. पिंपरी-चिंचवडचे समन्वयक अधिकारी संतोष माने, दक्षता पथक अधिकारी अशोक सोनवणे, कुंडलिक भापकर, बाळासाहेब बंडगर हे पथक कार्यरत आहे. गेल्या सव्वा महिन्यात 4 खासगी बस, 2 मिनी बस, 1 टेम्पो ट्रव्हलर, 2 जीप, 3 सहा आसनी रिक्षा, 42 तीन आसनी रिक्षा आणि 1 पॅगो रिक्षा अशा 55 वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहे. या मोहिमचा फायदा वाहकांना व चालकांना अधिक होत आहे. प्रवासी संख्येत वाढ झाली असून, बस थांबे अवैध वाहनापासून मोकळे होवू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.