अकोलेत तीन कापड दुकानदारांवर कारवाई; व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता

अकोले  (प्रतिनिधी) – अकोले येथे शनिवारपासून (दि.23) व्यवहार सुरळीत झाले. मात्र सोशल डिस्टन्स न पाळण्याचे कारण देऊन तीन कापड दुकानदारांवर तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केली. ही दुकाने सील करून दंडात्मक पावले उचलली असल्याने व्यावसायिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.

अकोले येथे शनिवारपासून बहुतेक व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू केली. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खरेदीसाठी छोट्या-मोठ्या दुकानांकडे आपला मोर्चा वळवला. तीन कापड दुकानांना व अन्य दुकानांना तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी भेटी दिल्या. या दरम्यान या तीन दुकानांत अनेक ग्राहक आढळून आले. तसेच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमास हरताळ फासला होता. त्यामुळे या तिन्ही दुकानांना सील करून दंडात्मक कारवाई केली.

दुकानदारांनी ग्राहकांना आम्ही वेळोवेळी अंतर ठेवण्याचे आवाहन केले. याचदरम्यान अधिकाऱ्यांनी दुकानाला भेट दिली व दुकाने सील केली. त्यांचा निर्णय हा अंतिम असला, तरीही परिस्थिती वेगळी आहे. साठ दिवसांपेक्षा अधिक काळ दुकाने बंद राहिल्याने ग्राहकांच्याही भावना अधिकाऱ्यांनी समजावून घेण्याची गरज आहे. त्यापुढे आम्ही या संदर्भातील शासकीय नियमांचे काटेकोर पालन करू, असे दुकानदारांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.